
पारगाव शिंगवे (ता. आंबेगाव) येथील मूळ रहिवासी तथा भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले विजय कांताराम ढोबळे (वय ४०) यांचे सोमवारी (दि. २२ डिसेंबर २०२५) दुःखद निधन झाले. मागील नऊ महिन्यांपासून ते मृत्यूशी झुंज देत होते. त्यांच्या निधनामुळे पारगाव (शिंगवे) व परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

नऊ महिन्यांपूर्वी विजय ढोबळे हे त्यांचे दोन मुलांबरोबर बेल्हे (ता. जुन्नर) येथे जेवणासाठी जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. या अपघातात दगडाला ठोकर बसल्याने ते गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर स्थानिक उद्योजक गौरव विलास बांगर यांनी त्यांना तत्काळ मदत करून त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना पारगाव-पुणे येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.

त्यानंतर गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्यावर सातत्याने उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद देत असतानाही अखेर सोमवारी त्यांची जीवनझुंज अपयशी ठरली. मंगळवार, दि. २३ डिसेंबर २०२५ रोजी पारगाव शिंगवे येथे घोड नदीच्या तीरावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विजय ढोबळे हे भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर शांत, शिस्तप्रिय व समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांसह मित्रपरिवार आणि माजी सैनिक बांधवांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या जाण्याने एक कर्तव्यनिष्ठ सैनिक आणि सज्जन व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.











