
महाळुंगे पडवळ (फुलेवाडी) ता. आंबेगाव येथे ग्रामदैवत वेताळ महाराज यांच्या यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व बैलगाडा शर्यतींचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२५ ते शनिवार दिनांक २ जानेवारी २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

या धार्मिक उत्सवांतर्गत दिनांक १ रोजी कलशाची भव्य मिरवणूक, दिनांक २ रोजी मंदिर कलशारोहण कार्यक्रम, तसेच दिनांक ३ व ४ रोजी पारंपरिक बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे. या शर्यतींसाठी पंचक्रोशीतील बैलगाडा मालक व शौकीन मोठ्या संख्येने सहभागी होणार असून स्पर्धांना मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. महाळुंगे पडवळ फुलेवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताहाला सुमारे दीडशे वर्षांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. या वर्षी मंदिराच्या कलशारोहणासह विविध विकास व सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात आली असून यासाठी देणगीदारांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

सप्ताह काळात दररोज नामांकित कीर्तनकारांची कीर्तने, भजन, प्रवचन, हरिपाठ, तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांसाठी महाप्रसाद व भोजन समारंभही नियमितपणे पार पडत असून परिसरातील गावांतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. या पवित्र यात्रेचा, अखंड हरिनाम सप्ताहाचा व बैलगाडा शर्यतींचा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











