
आंबेगाव पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित तालुकास्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी लांडेवाडी या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. उद्घाटन प्रसंगी राज्याचे माजी गृहमंत्री. दिलीप वळसे पाटील व शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार मा.शिवाजीराव दादा आढळराव पाटील तसेच तालुक्याच्या गटविकास अधिकारी मा. अर्चना कोल्हे मॅडम गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, सचिन वाघ नायब तहसीलदार, शोभा पालवे तालुका क्रीडा अधिकारी, नोडल अधिकारी संचिता अभंग व कांताराम भोंडवे, शिक्षण विभागातील सर्व अधिकारी शिक्षक संघटनांचे सर्व प्रतिनिधी, शिक्षक बंधू भगिनी स्पर्धक खेळाडू व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान राष्ट्रीय खेळाडू दुर्वा गोरडे या विद्यार्थिनीला देण्यात आला. उद्घाटन प्रसंगी मा. वळसे पाटील हे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे खूप महत्त्वाचे काम यातून होत असून दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेच्या आयोजनातून पारंपारिक देशी खेळ कबड्डी खो-खो आट्यापाट्या या बरोबर बुद्धिबळासारक्या खेळाचाही समावेश करण्यात आल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यामुळे एक चांगले व्यासपीठ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेले आहे.

गेली अनेक वर्षे हा उपक्रम सुरू असून नवीन खेळाडू घडविण्याचे काम या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या कला गुणांना वाव देणे तसेच सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी या माध्यमातून मिळालेली आहे जिल्हा परिषदेचा हा स्तुत्य उपक्रम असून या प्रेरणादायी उपक्रमाचे मी अभिनंदन करतो. या स्पर्धेत सहभागी सर्व स्पर्धक खेळाडूंना व मार्गदर्शक शिक्षकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या . तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यासाठी माजी खासदार मा. शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांनी स्पर्धक खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व या स्पर्धेसाठी लागणारे आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.

जुन्या काळातील आट्यापाट्या खेळाने स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांचे लक्ष वेधले. अनेक विद्यार्थी हा खेळ मोठ्या उत्सुकतेने पाहत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माननीय गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका मॅडम यांनी केले. या स्पर्धेमध्ये पंच म्हणून आंबेगाव तालुका माध्यमिक क्रीडा शिक्षक यांनी खूप मोलाची कामगिरी बजावली. होण्यासाठी सर्वच शिक्षक संघटना शिक्षण विभाग व सर्व शिक्षक यांनी मोलाचे सहकार्य केले अतिशय खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात या स्पर्धा पार पडल्या. सलग दुसऱ्या वर्षी मानाचा चषक जारकरवाडी या शाळेने पटकावला या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जिल्हा परिषद पुणे चे माजी उपाध्यक्ष मा.विवेकदादा वळसे पाटील हे उपस्थित होते. हार आणि जीत या नाण्याच्या दोन बाजू असून सर्व विद्यार्थ्यांनी मनापासून स्पर्धेची तयारी करून आपले कौशल्य पणाला लावले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व विजयी स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. सर्वांचे आभार शिक्षण विस्तार अधिकारी मा. भोंडवे साहेब यांनी व्यक्त केले.










