
भीमाशंकर ज्योतिर्लिंग विकास आराखड्याच्या माध्यमातून श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे होणाऱ्या विविध विकास कामाच्या पार्श्वभूमीवर मंदिर पुढील तीन महिने बंद करण्याबाबतची बैठक आंबेगाव – जुन्नर चे प्रांत गोविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत मंदिर बंद ठेवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सहमती दर्शविली असून याबाबत प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट, स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील व त्यानंतर जिल्हाधिकारी मंदिर बंद बाबत आदेश काढतील अशी माहिती देण्यात आली.

श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग असून वर्षभरात देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक भक्त, पर्यटक येथे येत असतात नाशिक येथील त्रंबकेश्वर येथे कुंभमेळा होत आहे. प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळा प्रसंगी वाराणसी, अयोध्या, उज्जैन या तीर्थक्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे नाशिक येथे २०२७ रोजी होणाऱ्या कुंभमेळा वेळी भीमाशंकर इतर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होणार हे लक्षात घेऊन भीमाशंकर येथे येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधा पुरविण्यासाठी व नव्याने काही कामे करण्यासाठी २८८.१७ कोटींच्या विस्तृत विकास आराखड्यातील कामांना गती देण्यासाठी व लवकरात लवकर ही कामे पुर्ण करण्यासाठी प्रशासन, भीमाशंकर देवस्थान व स्थानिक ग्रामस्थ यांच्या वतीने श्री क्षेत्र भीमाशंकर येथे बैठक घेण्यात आली.

यावेळी तीन महिन्यांसाठी श्री क्षेञ भीमाशंकर मंदीर हे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. ह्या वेळी स्थानिक ग्रामस्थांनी ह्याला सहमती दर्शविली. प्रशासकीय अधिकारी हे भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट स्थानिक ग्रामस्थ यांचे म्हणणे व बैठकीचा अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करतील यानंतरच जिल्हाधिकारी मंदिर बंद बाबतचा आदेश काढणार आहेत. यावेळी प्रशासन देवस्थान ट्रस्ट व स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंदिर परिसर पायरी मार्ग बस स्थानक वाहनतळ याची पाहणी करण्यात आली. या वेळी आंबेगाव जुन्नर चे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, खेडचे उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, जिल्हा नियोजन अधिकारी गणेश दाणी, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, खेड तहसिलदार प्रशांत बेडसे, सचिन वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहणे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर शास्त्री गवांदे शरद बँकेचे संचालक मारुती लोहकरे, भीमाशंकरचे सरपंच दत्ताञय हिले, निगडाळे सरपंच सविता तिटकारे, स्थानिक ग्रामस्थ, देवस्थान विश्वस्त, उपस्थित होते.












