
राजगुरूनगर येथील न्यायालयासमोर असलेल्या भवानी मेडिकलमध्ये ड्रग इन्स्पेक्टर असल्याची बनावट ओळख सांगून तपासणी करण्याचा प्रयत्न करत २० हजार रुपयांची मागणी करणार्या तोतया व्यक्तीचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी आनंद गौतम भुजंग (वय ३४, रा. प्रियदर्शनी नगर, साई स्नेह पार्क, जुनी सांगवी, पुणे) याच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताराराम तेजारामजी चौधरी (वय २९) हे राजगुरूनगर न्यायालयासमोर भवानी मेडिकल चालवितात. मंगळवारी (दि. २३) दुपारी सुमारे १.१० वाजता एकजण त्यांच्या मेडिकलमध्ये आला. त्याने स्वतःला महाराष्ट्र शासनाच्या ड्रग कंट्रोल प्रशासनातील ड्रग इन्स्पेक्टर असल्याचे सांगत बनावट ओळखपत्र दाखवले. मेडिकलचे लायसन्स तपासण्याची चौकशी करताना संशयास्पद वर्तन केल्याने चौधरी यांना त्याच्या ओळखीबाबत शंका निर्माण झाली. त्यांनी तात्काळ खेड मेडिकल असोसिएशनचे सदस्य राजेश पोपट चौधरी यांना याची माहिती दिली.

घटनास्थळी आल्यानंतर दोघांनाही संबंधित व्यक्ती तोतया असल्याचा ठाम संशय आला. त्यानंतर त्वरित खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला. संशयित इसमासह फिर्यादी व साक्षीदारांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान संबंधिताने आपले खरे नाव आनंद गौतम भुजंग असल्याचे कबूल केले. तो कोणताही सरकारी अधिकारी नसून, सरकारी कर्मचारी असल्याची बतावणी करून फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी आनंद गौतम भुजंग याच्याविरुद्ध तोतयागिरी करून सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे व फसवणूक करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.












