
मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी रविवारी क्रीडा संकुल, मंचर येथे होणार असून, निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिल्याने उमेदवारासह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दहा टेबलांवर तीन फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी गोविंद जाधव यांनी दिली.

मंचर नगरपंचायतीची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, प्रभाग क्रमांक १ हा बिनविरोध निवडून आला आहे. नगराध्यक्षपदासह उर्वरित १६ प्रभागांची मतमोजणी सकाळी दहा वाजता सुरू होणार आहे. मतमोजणीसाठी महसूल विभागातील कर्मचारी, तसेच अवसरी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुमारे ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मतमोजणी परिसरात ५० पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात केवळ विहित ओळखपत्र असलेले उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनाच प्रवेश दिला जाणार असून, फेरीनिहाय प्रवेशाची व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित प्रभागाची मतमोजणी पूर्ण होताच प्रतिनिधींना केंद्राबाहेर जाणे बंधनकारक राहणार आहे. पहिल्या फेरीत बूथ क्रमांक १ ते १० पर्यंत, दुसऱ्या फेरीत बूथ क्रमांक १, २ व ९ ते १७, तर तिसऱ्या व अंतिम फेरीत उर्वरित बूथची मतमोजणी होणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. क्रीडा संकुल परिसरात मतमोजणीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा व व्यवस्था करण्यात आल्या असून, कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षणही दिले आहे. मंचर नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीच्या निकालाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.











