
रब्बी हंगाम कांदा पिकासाठी अधिक पोषक असल्याने शेतकरी कांदा लागवडीत मग्न आहेत. आंबेगाव तालुक्यातील मेंगडेवाडी, निरगुडसर,लोणी, धामणी,जारकरवाडी, लाखणगाव,काठापूर बुद्रूक, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळूंजनगर, रानमळा आदी गावांमध्ये कांदा लागवडीत शेतकरी व्यस्त आहे. सध्या लागवडीसाठी मजूर मिळत नसले, तरी शेतकरी सावड पद्धतीने व मजूर उपलब्ध करून कांदा लागवड करत आहेत. कांद्याच्या भावात चढतार होत असला तरी शेतकऱ्यांचा कांदा लागवडीकडे कल वाढला आहे. त्यामुळे कांदा रोपांनाही भाव वाढला आहे.

परिसरात शेतकऱ्यांकडून बाजारात येणाऱ्या कांद्याची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी-अधिक प्रमाणात होत आलेली आहे.कांदा बाजारात प्रतिकिलो किलो २६ ते २७ रुपये दराने विकला जातो. पण कांद्याच्या रोपाला कांद्यापेक्षा अधिक भाव असून, सध्या एकरभर कांदा लागवडीच्या रोपासाठी १५ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. कांद्यापेक्षा रोपाला अधिक भाव आल्याने यंदा कांद्याची लागवड महागडी ठरत असली, तरी कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.यंदा कांदा रोपांची मागणी वाढल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड होण्याचा अंदाज आहे.

सध्या तालुक्यातील शेतकऱ्यांकडे उन्हाळी कांदा लागवड सुरू आहे. शेतकरी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची लागवड करतात.अल्पभूधारक शेतकरी कांद्याच्या बियाण्यांपासून रोपे तयार करून योग्य त्या बाजारभावाने विक्री करतात. परिसरात यंदा कित्येक शेतकऱ्यांचे टाकलेले रोप पाडक झाले, तर काही शेतकऱ्यांचा रोप चांगले उतरले. बदलत्या हवामानाचा फटका कांदा रोपाना बसला आहे. तरीही काही शेतकरी शेतकऱ्यांना चांगल्या भावात मोठ्या प्रमाणात कांदा रोपांची विक्री करत आहेत. काही शेतकरी मिळेल त्या भावात रोपे विकत घेत असून,आपली लागवड उरकून घेत आहेत. बाजारात कांद्याची आवक वाढली की कांद्याचे भाव पडतात. कांद्याची टंचाई निर्माण होते तेव्हा भाव वाढतात. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांकडे कांदा नसल्यामुळेच सध्या कांद्याला दहा किलोस २६० ते २७० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कांद्याच्या रोपालाही सुगीचे दिवस आले आहेत. डिसेंबर अखेर कांद्याचे भाव स्थिर राहतील, असा अंदाज आहे. सध्या कांद्याला चांगला बाजार भाव असल्याचा परिणाम म्हणून अनेक शेतकऱ्यांची कांदा लागवडीकडे लगबग सुरू आहे. सध्या कांदा लागवडीसाठी मजूरांना ४०० रुपये मजूरी द्यावी लागते शिवाय बाहेर गावावरून मजूर आल्यास गाडीभांडे १००० ते २००० रुपये द्यावे लागतात. साधारण एक एकर कांदा लागवडी साठी १६ मजूर लागतात. त्यामुळे कांदा लागवड महागात पडते. पण बाजार चांगला मिळाला तर ठिक नाहीत आर्थिक फटका सहन करावा लागतो.











