
सुलतानपूर ता. आंबेगाव येथे घोडनदीच्या काठालगत लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात सुमारे पाच वर्षे वयाची बिबट्याची मादी गुरुवारी दि. १८ रोजी पहाटे जेरबंद झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून या परिसरात बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर होता. त्यामुळे जनतेत भीतीचे वातावरण होते. स्थानिक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरा लावला. ग्रामपंचायत सदस्य प्रवीण शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सुनील वाघ, पोलीस पाटील निखिल गाडे, सामाजिक कार्यकर्ते संजय शिंदे, आणि रोहिदास सूर्यवंशी यांनी बिबट्याच्या वाढत्या वावराबाबत वारंवार वन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या मागणीची दखल घेत मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी घोडनदीच्या बाजूला पिंजरा लावला. पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. या पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकली.

बिबट्या पकडल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बिबट्या पकडल्याने सुलतानपूर परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. मात्र, या भागात अजूनही दोन ते तीन बिबट्या असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी आंबेगाव तालुका पोलिस संघटनेचे अध्यक्ष निखिल हरिचंद्र गाडे पाटील यांनी केली आहे.











