
तांबडेमळा ता. आंबेगाव गावाने मंचर एसटी डेपोला पाच एकर जागा दिली आहे. परंतु अवसरी फाटा येथे राज्य परिवहन महामंडळाचा अधिकृत बस थांबा नसल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील प्रवाशांना पुणे, चाकण, भोसरी तसेच नाशिक येथे ये – जा करण्यासाठी मंचर एसटी स्टँड येथे जावे लागते तसेच रात्रीच्या वेळी मंचर वरून एसटीची सोय नसल्याने खाजगी रिक्षाने जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत असल्याने राज्य परिवहन महामंडळाने अवसरी फाटा येथे एसटीचा अधिकृत बस थांबा मंजूर करावा अशी मागणी पूर्व भागातील १५ ते २० गावातील प्रवासी व नागरिकांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्यात राज्य परिवहन महामंडळाचा एसटी आगार नसल्याने आंबेगाव तालुक्यातील प्रवाशांना नारायणगाव, राजगुरुनगर आगारावर अवलंबून राहावे लागत असे आंबेगाव तालुक्यासाठी मंचर येथे एसटी आगार व्हावें म्हणून प्रवाशांसाठी ३५ ते ४० वर्षापूर्वीची मागणी होती. मागणीचा विचार करून माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचर एसटी आगार चार वर्षांपूर्वी मंजूर केले मंचर एसटी आगारासाठी तांबडेमळा या गावाने पाच एकर जागा मोफत दिली. मात्र अवसरी फाटा येथे एसटीचा अधिकृत थांबा नसल्याने पुणे नाशिक इतर कोणतीही एसटी अवसरी फाट्यावर न थांबता मंचरला थांबत असल्याने पूर्व भागातील प्रवाशांना मंचर वरून पुन्हा तीन किलोमीटर खाजगी वाहनांनी जावे लागते. त्यामुळे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अवसरी फाटा येथे एसटीच्या अधिकृत थांबा मंजूर करून प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण करावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.













