
अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक या सात किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. वाहन चालकांना खड्ड्यातून रस्ता शोधावा लागत आहे. अवसरी खुर्द एसटी स्टँड जवळील खड्डा पिकप चालकाच्या लक्षात न आल्याने पिकप गाडीचे मागील चाक खड्ड्यात गेल्याने पिकप गाडी पलटी होता, होता वाचली आहे. गेली सहा महिन्यापासून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून संबंधित विभाग जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्यातील नागरिकांना तसेच वाहनचालक अवसरी मार्गे हा जवळचा रस्ता आहे तसेच या रस्त्यावरून भीमाशंकर साखर कारखान्याचे उसाचे साखरेचे ट्रक, दुधाचे टॅंकर, भाजीची टेम्पो, हायवा ट्रक, खाजगी वाहनाची पहाटे पाच ते रात्री दोन वाजेपर्यंत अडीच ते तीन हजार वाहनांची ये-जा चालू असते परंतु मागील एक वर्षापासून अवसरी खुर्द ते अवसरी बुद्रुक सात किलोमीटर अंतरावर डांबरी रस्ताच राहिला नाही रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्याने रस्त्यावरून ये जा करणाऱ्या ट्रकचे टायर फुटणे, पाटे तुटणे, खड्डे चुकवताना मोटरसायकल चालकांचे छोटे मोठे अपघात होऊन वर्षभरात तीन ते चार जणांचे बळी गेले आहेत.

अवसरी फाटा ते अवसरी बुद्रुक रस्त्याचे एप्रिल अखेर खड्डे बुजवले गरजेचे होते परंतु या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. या रस्त्यावरून सर्वपक्षीय राजकीय पक्षाचे पुढारी स्वतःची वाहने घेऊन दररोज ये जा करत असून देखील सुद्धा एकही पुढारी संबंधित विभागाकडे भ्रमणध्वनी करत नसल्याचे वाहन चालकांनी नाराजी व्यक्त केली असून राज्याचे माजी मंत्री, आंबेगाव तालुक्याचे आमदार दिलीपरावजी वळसे पाटील यांनी संबंधित विभागाच्या ठेकेदारांना रस्ते बुजवण्याबाबत कडक सूचना द्याव्यात अशी मागणी प्रवासी, वाहन चालक वर्गाकडून होत आहे.











