
प्रतिनिधी – समीर गोरडे
चांडोली (ता.आंबेगाव) येथे मंचर बीटच्या यशवंतराव चव्हाण कला,क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवानिमित्त आयोजित केंद्रस्तरीय विविध कला क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांत चार केंद्रातील 35 जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील केंद्रस्तरावर प्रथम आलेल्या १६० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,अशी माहिती केंद्रप्रमुख राजू जाधव यांनी दिली.

स्पर्धेची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली.यावेळी विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे आयोजन लहान गटात इ. १ ली व २ री, इ. ३ री व ४ थी आणि मोठ्या गटात इ. ५ वी ते इ. ८ वी स्वरूपात करण्यात आले होते. वैयक्तिक क्रीडा प्रकारात धावणे,उंच उडी, लांब उडी,वक्तृत्व,लिंबू चमचा,बेडूक उड्या, वेशभूषा,गोळाफेक, थाळीफेक,बुद्धिबळ तसेच सांघिक क्रीडा प्रकारात बडबडगीत,कविता गायन, भजन,प्रश्नमंजुषा,कबड्डी, खो-खो,लोकनृत्य,लेझीम, लंगडी आदी स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कला व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. सर्व स्पर्धा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील क्रीडाप्रेमी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र,शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिक्षक यांनी परिश्रम घेतले.सर्व विजयी स्पर्धकांचे पं.स.आंबेगावच्या वतीने गटशिक्षणाधिकारी रुपाली धोका यांनी अभिनंदन केले.केंद्रप्रमुख राजु जाधव यांनी प्रास्ताविक तर विस्तार अधिकारी शैला निमसे यांनी आभार मानले.











