
आंबेगाव – शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती पिकासाठी पाण्याची कमतरता जाणवत असून पाटबंधारे विभागाने उजवा, डावा कालवा व घोड शाखा कालव्यास पाणी सोडावे अशी मागणी आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन कुकडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.

सद्यस्थितीत रब्बी हंगाम सुरू असून कांदा, भाजीपाला तसेच अन्य पिकांसाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. मात्र कालव्यात पाण्याचा पुरवठा थांबल्याने पिके वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. तालुक्यातील शेतीक्षेत्रावर अवलंबून असलेल्या शेकडो शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली असून त्यांच्या शेतातील पिकांना पाण्याअभावी मोठा फटका बसत आहे. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था आणखी ढासळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकारी अभियंता, कुरकुंडी पाटबंधारे विभाग, नारायणगाव यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात “उजवा, डावा कालवा व घोड शाखा कालव्यास पाणी सोडावे” अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ पोखरकर, खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिलारी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष वैभव उंडे, खडकी गावचे सरपंच दत्तात्रय बांगर, भराडी गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष नवनाथ गावडे, ॲड संदीप टेमगिरे, जाधववाडी सरपंच विशाल जाधव, चेअरमन बाबाजी जाधव, माजी अध्यक्ष विकासराव वाघमारे उपस्थित होते.












