
महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव येथील मेंढपाळ माणिक पांडुरंग हांडे मेंढ्या चारत असताना बुधवारी (दि १०) दुपारी तीन वाजता अचानक उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने एक मेंढी ओढत नेऊन फस्त केली. ही घटना महाळुंगे पडवळ येथील शेतकरी ज्ञानेश्वर लिंबाजी पडवळ यांच्या शेतात घडली आहे.


यावेळी सयाजी लक्ष्मण भडांगे, प्रकाश संजय काळे यांनी प्रत्यक्ष ही घटना पाहिली. भर दुपारी बिबट्या वेगाने चाल करून आला. त्या बिबट्याने एक मेंढी तोंडात पकडून पुन्हा उसाच्या दिशेने निघून गेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. सर्व जनावरे सैरभैर झाली होती. भयभीत झालेल्या महिलांनी कांदा लागवडीचे काम बंद करून घर गाठले. मंगळवारी (दि. ९) मच्छिंद्र सैद यांच्या शेतात बिबट्याची दोन पिले आढळली होती. तर माजी सरपंच अशोक डोके हे रानात जनावरे घेऊन जात असताना दोन बिबट्याची पिले त्यांना दिसली. महाळुंगे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून प्राण्यांवर हल्ले करणारा बिबट्या आता माणसांवरही हल्ला करू शकतो. त्वरित बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर, जनमित्र दिनकरराव आवटे मित्रमंडळाचे उपाध्यक्ष सुदाम पडवळ व ग्रामस्थांनी दिला आहे.











