
शिक्षक पगार घेतात आदिवासी भागाचा आणि काम करतात सोयीसुविधांच्या भागात.. प्रशासन लक्ष घालणार का?
सरकारच्या निर्णयानुसार शिक्षकांची या वर्षीची ऑनलाईन बदली प्रक्रिया पार पडली. शिक्षक शाळेवर रूजू झाले. मात्र, बदल्या होऊन एक महिना होतो न होतो तोच पेसा भागातील शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्या करून आंबेगावच्या गटशिक्षण अधिकारी यांनी किसान सभेने दिलेल्या निवेदनाची दखल न घेता बदल्यांचे सर्व नियम पायदळी तुडवत बदल्यांचा धडाका सुरू आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नर या दोनच तालुक्यांत अनुसूची ६ नुसार पेसा क्षेत्र असून, यासाठी वेगळे नियम आहेत. ऑनलाईन बदली प्रक्रियेतही पेसा भागातील शिक्षकांच्या जागा रिक्त ठेवता येत नाही. त्यामुळे ऑनलाईन बदली प्रक्रियेत तेथील सर्व जागा भरल्या गेल्या. या भागात अनेक द्विशिक्षकी शाळा असून प्रत्येक शाळेवर दोन शिक्षक मंजूर आहेत. त्यामुळे सरकारने ऑनलाईन बदली प्रक्रियेत येथील प्रत्येक शाळेवर दोन शिक्षक नेमले आहेत. पेसा भागातील शिक्षक दुसरीकडे हलविता येत नाही असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी आंबेगाव पंचायत समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी सांगितले असतानाही गटशिक्षण अधिकारी यांनी अनेक शिक्षकांच्या बदल्या सदन भागातील शाळांवर तोंडी सांगून केल्या आहेत. पण या शिक्षकांना पगार आदिवासी भागाचाच मिळत आहे. असा आरोप किसान सभेच्या कार्यकर्त्याची केला आहे.

या बाबत किसान सभेचे अशोक पेकारी, रामदास लोहकरे, नंदाबाई मोरमारे, दत्ता गिरंगे, राजू घोडे, काळूराम कढन, लहू रोंगटे, ज्ञानेश्वर केंगले, निवृत्ती इष्टे यांनी आंबेगाव गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये त्यांनी आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये पेसा कायदा लागू असताना काही शिक्षकांच्या बदल्या तोंडी आदेशाने पूर्व भागात करण्यात आल्याने पेसा कायद्याची पायमल्ली होत आहे. आदिवासी भागातील शिक्षणाची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून शिक्षकांच्या अशा प्रकारे बदल्या केल्याने त्याचा मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होऊ ‘शकतो.. त्यामुळे किसान सभेने या शिक्षकांच्या या बदल्यांना विरोध केला आहे. अन् शिक्षकांच्या बदल्या न करता ज्या ठिकाणी बदल्या झाल्या आहेत, त्या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदनात म्हटले असताना गटशिक्षणाधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.











