

पुणे–नाशिक या राज्यातील दोन वेगाने वाढणाऱ्या शहरांना जोडणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला अखेर नवा कलाटणी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या मूळ मार्गाला जुन्नर तालुक्यातील खोडद येथील GMRT – Giant Metrewave Radio Telescope प्रकल्पामुळे पूर्णपणे स्थगित करण्यात आले आहे. त्याऐवजी केंद्र सरकारने तांत्रिक सुरक्षितता लक्षात घेऊन नवीन मार्गाला प्राथमिक मंजुरी दिल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच लोकसभेत दिली.


मूळ “पुणे–नाशिक महामार्गालगतचा” रूट पूर्णपणे रद्द करून केंद्राने शिर्डी → अहमदनगर → शिक्रापूर → शिरूर → पुणे हा मार्ग निवडल्याने आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
GMRT परिसरात रेडिओ सिग्नल संवेदनशीलता अत्यंत जास्त असल्याने, रेल्वेमार्ग–विद्युत कामे–ध्वनी कंपनांचा प्रकल्पावर गंभीर परिणाम होऊ शकतो, या कारणावरून हा वळसा देण्यात आल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले असून स्थानिक खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी या बदललेल्या मार्गावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून यामुळे “उत्तर पुण्याचा विकास खुंटेल” असा त्यांनी गंभीर आरोप केला आहे. त्याच बरोबर उत्तर पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मागे पडेल, कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांना मोठी चालना मिळाली असती, मंचर–शिरूर–आळंदी–राजगुरूनगर परिसरातील वाहतूक कोंडी निवळण्यास मदत झाली असती, स्थानिकांना गुंतवणूक व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या असत्या मात्र मार्ग बदलल्याने “विकासाचा महामार्ग वळवून उत्तर पुण्याशी अन्याय केला जात आहे,” अशी त्यांची टीका केंद्रावर केली आहे.


GMRTमुळे विकास अडथळ्यात? खोडद ग्रामस्थांचा उद्रेक
जुन्नर तालुक्यातील खोडद येथे असलेला GMRT प्रकल्प जागतिक दर्जाचा असला तरी त्याच्या संवेदनशीलतेमुळे परिसरात अनेक निर्बंध लादले जातात—मोठी बांधकामे, उंच मनोरे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, औद्योगिक प्रकल्प, इत्यादींवर कठोर नियंत्रण असल्याने ““रेल्वे गेली, रोजगार गेला, व्यापाराची संधी गेली.” “गाव मोठं व्हावं असेल तर प्रत्येक गोष्टीत GMRTचा आडकाठी.”“जगासाठी प्रकल्प मोठा, पण आमच्यासाठी तो कायमचा बोजा!” असे प्रश्न उपस्थित केले आहे.


GMRTच्या संशोधनाचे महत्त्व आणि त्याच्या संरक्षणासाठी घेतलेला मार्ग बदलाचा निर्णय वैज्ञानिक दृष्ट्या योग्यच वाटतो. परंतु, दशकभरापासून रेल्वेमार्गाची वाट पाहणाऱ्या उत्तर पुण्यातील नागरिकांची आशा आणि स्वप्ने मोठ्या प्रमाणात पांगली—ही भावना आमच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये ठळकपणे उमटली असून निर्णय वैज्ञानिकदृष्ट्या अपरिहार्य — पण विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्रामस्थांसाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण. उत्तर पुण्याचा विकास, स्थानिकांना रोजगार, उद्योगांची अपेक्षित वाढ—या सर्वावर अनिश्चिततेचे सावट येऊन बसले आहे. दुसरीकडे भारताच्या महत्त्वाच्या खगोलशास्त्रीय प्रकल्पाचे संरक्षण देखील तेवढेच आवश्यक असल्याची जाणिव सरकारला कायम ठेवावी लागत आहे. नवीन मार्गाला मंजुरी मिळाल्याने प्रकल्प सुरु होण्याची शक्यता वाढली असली तरी उत्तर पुणे अजूनही ‘विकासाच्या प्रतीक्षेत’च राहिले आहे.











