
घोडेगाव (ता. आंबेगाव ) आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसुचित जमाती व दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांना,राबविण्यात आलेल्या फळ भाजीपाला विकसित करण्याकरता शेडनेटची उभारणी करणे या योजनेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता व शासकीय निधीचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सहाय्यक प्रकल्प अधिकारी संदीप आप्पाजी पाटील (वय ४४) यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मिलिंद नामदेव मडके याचेवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की सन २०१३-१४ मध्ये आदिवासी विकास विभागाच्या शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील शेतकऱ्यांच्या शेतात दर्जेदार फळबाग लागवड करण्यासाठी योजना मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत खेड आंबेगाव जुन्नर तालुक्यातील ३७ लाभार्थ्यांसाठी काम मंजूर झाले होते. सदर योजना राबविण्याची जबाबदारी आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान, लाईफ केअर लॅब, जुन्नर या संस्थेला देण्यात आली होती. योजनेसाठी एकूण ९० लाख ५४ हजार ९०० रुपये इतका निधी मंजूर झाला होता. पहिल्या टप्प्यात ४५ टक्के म्हणजे ४५ लाख २७ हजार ४५० रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित रक्कम संस्थेला अदा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात योजनेतील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण राहिल्याचे तपासातून स्पष्ट झाले. कार्यालयाकडून वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार, नोटिसा व सूचना देऊनही संबंधित संस्थेने कामे पूर्ण केली नाहीत. सन २०१९ मध्ये करण्यात आलेल्या तपासणीत ३७ पैकी १५ ठिकाणी कामे अपूर्ण असल्याचे निष्पन्न झाले.

तरीही संस्थेने काम पूर्ण केल्याचा दावा केला.
यानंतर २०२१ व २०२२ मध्ये लाभार्थ्यांकडून तक्रारी प्राप्त झाल्या. वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार चौकशी करण्यात आली असता, संस्थेने शासनाच्या अटी व शर्तींचे उल्लंघन करून निधीचा गैरवापर केल्याचे निदर्शनास आले. संस्थेकडून अपूर्ण कामांची रक्कम परत न करता उलट शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप आहे. सन २०२३ ते २०२५ या कालावधीतही वारंवार नोटिसा बजावूनही संस्थेने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर वरिष्ठ स्तरावरून कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात आले. त्यानुसार दिनांक ८ डिसेंबर २०२६ रोजी संबंधित संस्थेविरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सुमारे लाख ३१,०३,२१८ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार झाल्याचा आरोप असून याप्रकरणी जुन्नर येथील आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान लाइफ केअर लॅबच्या अध्यक्ष मिलिंद नामदेव मडके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास घोडेगाव पोलीस करीत आहेत. आदिवासी विकास योजनेतील या गैरव्यवहारामुळे अनेक आदिवासी लाभार्थी योजनेपासून वंचित राहिल्याचे समोर आले आहे.












