
पिंपळगाव खडकी तालुका आंबेगाव येथील कामठे मळ्यात मंगळवारी (दि. ३०) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास सुमारे ३५ फूट उंचीवरील नारळाच्या झाडावर बिबट्या दिसला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भक्ष्याचा पाठलाग करत बिबट्या थेट नारळाच्या झाडावर चढल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

कामठे मळ्यातील अशोक गेनभाऊ कामठे या शेतकऱ्याच्या घराजवळ असलेल्या नारळाच्या झाडावर बिबट्या चढताना स्थानिक शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष पाहिले. बिबट्या झाडाच्या अगदी वरच्या टोकापर्यंत गेला. तेथून काही तरी खाली पडल्याचेही ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यानंतर काही वेळातच बिबट्या झाडावरून खाली उतरून बाजूच्या उसाच्या शेतात निघून गेल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे बिबट्या झाडावर चढला असताना त्याचा बछडा देखील त्या झाडाच्या खोडापाशी असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. त्यामुळे मादी बिबट्या बछड्याच्या संरक्षणासाठी आक्रमक वावरत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक शेतकरी अभिषेक कामठे यांनी बिबट्या नारळावर चढल्याचा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला असता वन विभागाने या घटनेची दखल घेत घटनास्थळी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.













