
शेताचे बाजूला बांधावर उभ्या असलेल्या मुलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची गंभीर घटना गावडेवाडी ता. आंबेगाव गावच्या हद्दीत पिंपळमळा येथे घडली आहे. येथील नेहा दादाभाऊ खंडागळे वय ६ असे जखमी झालेल्या मुलीचे नाव असून तिच्यावर पुणे येथील वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की दादाभाऊ सिताराम खंडागळे यांची सहा वर्षाची मुलगी नेहा खंडागळे ही दि.१८ रोजी अंगणवाडीत गेली होती दुपारी राहुल सिताराम खंडागळे हा तिला शाळेतून घरी घेऊन येत असताना रोडच्या कडेला तो विहिरीवर मोटर चालू करण्यासाठी थांबला होता त्यावेळी त्यानें मुलगी नेहाला शेताच्या बांधावर उभे केले होते. राहुल खंडागळे हा मोटर चालू करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी आलेल्या एका भटक्या कुत्र्याने नेहावर हल्ला करत तिच्या दंडाला चावा घेतला कुत्र्याने तिला फरपटत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी शेजारी कांदा लागवड करत असलेल्या महिलांनी आरडाओरडा करत कुत्र्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र कुत्रा नेहाला सोडत नव्हता त्यावेळी संगीता पिंपळे, सविता शिंदे, संगीता गावडे या महिलांनी मुलीला कुत्र्यापासून ओढत तिचा जीव वाचवला या हल्ल्यात नेहा गंभीर जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या तिची प्रकृती ठीक आहे.

दरम्यान आंबेगाव तालुक्यात बिबट्याच्या धुमाकूळ सुरू असतानाच आता कुत्र्यांकडून देखील लहान मुलांवर हल्ले होऊ लागल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे गावागावात भटके कुत्रे गटाने फिरत असल्याने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे.











