पारगाव ता. आंबेगाव येथील लोखंडे मळा येथे दिवसाढवळ्या शेतकरी बाबाजी ढोबळे यांच्या बंद घराचे कुलूप घरफोडीची घटना घडली असून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटात असलेले १२ तोळे सोन्याचे दागिने व चार ते पाच तोळे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की पारगाव गावच्या हद्दीत लोखंडे मळा येथे बाबाजी ज्ञानेश्वर ढोबळे हे राहत असून दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान बाबाजी ढोबळे त्यांची पत्नी, मुलगा, सून हे पारगाव येथे सोनमाळ खंडोबा देवाच्या यात्रेला जागरण करण्यासाठी गेले होते. दुपारी एक वाजता ते घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी त्यांनी दरवाजाची पाहणी केली असता कुलूप तुटलेले दिसून आले तसेच घरात जाऊन पाहणी केली असता घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. ते यात्रेला गेल्यानंतर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराचा कुलूप तोडून दोन्ही कपाटातील लॉकर तोडून जवळपास १२ तोळे सोन्याचे दागिने व चार ते पाच तोळे चांदीचे दागिने चोरून नेले असल्याचे ढोबळे यांनी सांगितले. घटनेची माहिती कळताच पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.










