
मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) विद्यार्थी संघ आंबेगाव तालुक्याच्या वतीने शुक्रवारी सकाळी 10 वाजता मंचर बस स्टॅन्ड येथे विद्यार्थ्यांच्या बस-सुविधा वाढविण्याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. आंबेगाव तालुक्यातील अनेक विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मंचर येथे ये-जा करतात; मात्र बसची अपुरी संख्या व अनियमित फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.

या वेळी वरिष्ठ सहायक अधीक्षक यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांच्या हस्ते निवेदन स्वीकारण्यात आले. विद्यार्थ्यांनी सकाळी 7:30 ते 12:00 व सायंकाळी 4:00 ते 6:00 या गर्दीच्या वेळेत जादा बस फेऱ्या सुरू कराव्यात, सर्व बस फेऱ्यांमध्ये नियमित वेळापत्रक लागू करावे, ग्रामीण भागातून कॉलेज व शाळांकडे थेट बस सेवा वाढवावी अशा प्रमुख मागण्या केल्या. तसेच महात्मा गांधी विद्यालय मंचर समोरील बस थांब्यावर बसेस नियमित थांबत नसल्याची तक्रार करून त्या ठिकाणी बसेस थांबविण्याची ठोस व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली.

याशिवाय साकोरे व इतर काही गावातून थेट बस सेवा सुरू करावी, विद्यार्थ्यांना बस पास मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करावी, महिला विद्यार्थिनींसाठी सुरक्षित प्रवासाची विशेष व्यवस्था करावी व बस चालक-वाहकांनी विद्यार्थ्यांशी योग्य वर्तन करावे, अशा मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या.
विद्यार्थी संघ आंबेगाव तालुक्याने प्रशासनाला या मागण्यांवर 15 दिवसांचा अवधी दिला असून, या कालावधीत सकारात्मक निर्णय न झाल्यास विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नियमित व सुरक्षित बस सेवा मिळणे अत्यावश्यक असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी विद्यार्थी संघाने केली आहे.
– विद्यार्थी संघ आंबेगाव तालुका










