
पोंदेवाडी ता. आंबेगाव येथील पोखरकर वस्ती येथे राहणारे विजय पांडुरंग नरवडे यांच्या घरात दि. २० रोजी दुपारच्या सुमारास चोरी झाली असून अज्ञात चोरट्यांनी घरात असलेल्या कपाटातील १ लाख ६३ हजार ३१९ रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. याबाबत विजय नरवडे यांनी पारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की पोंदेवाडी पोखरकर वस्ती येथे विजय पांडुरंग नरवडे, पत्नी सोनाली विजय नरवडे व त्यांचा एक वर्षाचा लहान मुलगा हे राहत असून विजय पांडुरंग नरवडे हे शिक्रापूर येथे कामाला जातात. दिनांक २० रोजी विजय पांडुरंग नरवडे हे नेहमीप्रमाणे सकाळी कामाला गेले होते घरात सोनाली नरवडे व तिचा एक वर्षाचा मुलगा होता सोनालीची आई, वडील त्यांच्या घरापासून समोरच जवळच राहत असल्याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास सोनाली घराला कुलूप लावून माहेरच्या घरी गेली होती. दुपारच्या साडेतीन वाजता सोनालीच्या आईला सोनालीचा घराचा दरवाजा रस्त्यावरून उघडा दिसला तिने घरी गेल्यानंतर सोनालीला तुझ्या घराचा दरवाजा उघडा आहे असे सांगितले त्यावेळी त्यांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांचे कपाट उचकटलेले दिसले. त्यावेळी सोनाली नरवडे यांनी कपाटात दागिन्यांची शोधाशोध केली असता ते मिळून आले नाही. अज्ञात चोरट्याने कपाटातील १ लाख ६३ हजार ३१९ रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेला आहे.

दुपारच्या सुमारास कोणीतरी पाळत ठेवून ही चोरी केली असावी असा अंदाज वर्तवला जात असून दिवसा ढवळ्या झालेल्या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पारगाव पोलीस करत आहे.










