
पुणे – नाशिक महामार्गावर मंचर शहराच्या हद्दीत मोरडे कॅडबरी कंपनी समोर एसटी बस व प्रवासी रिक्षाचा अपघात झाला असून या अपघातात रिक्षा चालकासह रिक्षामधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवार दिनांक २ रोजी सकाळी सात वाजताच्या दरम्यान झाला असुन या अपघातात बस व रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नारायणगाव आगाराची एसटी बस एम एच १४ एम एच ४४२१ ही नारायणगाव ते पुणे अशी जात असताना बस समोरून एक कार ओव्हरटेक करत आली असता त्या कारचालकाला वाचवण्यासाठी एसटी बस चालकाने बस रस्त्याचे उजव्या बाजूला घेतली असता त्याच वेळी मोरडे कॅडबरी कंपनीच्या बाजूकडून येत असलेली रिक्षा क्रमांक एम एस १६ ए बी ५४२९ हिला बस धडकली या अपघातात रिक्षामधील रंजना दीपक शिंदे वय ४५, राहणार अवसरी खुर्द तालुका आंबेगाव, रिक्षा चालक दीपक किसन येलभर वय ५०, दीक्षा दीपक येलभर वय २० , किरण दत्तात्रय विरणक वय २० सर्व राहणार अवसरी बुद्रुक तालुका आंबेगाव हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली असून मंचर पोलीस पुढील तपास करत आहे.













